मुंबई : सरकारने गेल्यावर्षी ३१ हजार कोटी रुपयांचे पॅकेज जाहीर केले होते आणि खरडून गेलेल्या जमिनीसाठी हेक्टरी साडेतीन लाख रुपयांची घोषणा केली होती. मात्र, यातील प्रत्यक्ष मदत किती शेतकर्यांच्या हातात पोहोचली, याची माहिती महाराष्ट्राला मिळायला हवी. हवामान खाते व आंतरराष्ट्रीय संस्थांनी मोसमाच्या सुरुवातीलाच दुष्काळाचा अंदाज वर्तवला होता. ही शक्यता लक्षात घेऊन सरकारने आधीपासून दुष्काळ निवारणासाठी काय उपाययोजना केल्या, असा सवाल शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केला. दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर विशेष अधिवेशनाची मागणी ठाकरे यांनी केली.
यावेळी बोलताना उद्धव ठाकरे यांनी सांगितले की, पावसाअभावी शेतकर्यांना दुबार किंवा तिबार पेरणी करावी लागत आहे. परिस्थिती भयानक असून पिण्याचे पाणी, जनावरांचा चारा, धरणे-विहिरी भरणे आणि आगामी रब्बी हंगामासाठी समाधानकारक पाऊस व्हावा, अशी प्रार्थना उद्धव ठाकरे यांनी केली.
दरम्यान राज्यातील दुष्काळग्रस्त शेतकर्यांना घोषणा आणि पाहणीच्या फार्समध्ये न अडकवता सरकारने थेट आर्थिक मदत द्यावी, अशी मागणी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी गुरुवारी पत्रकार परिषदेत केली. दुष्काळाची परिस्थिती गंभीर असताना शेतकर्यांना तातडीच्या मदतीची गरज आहे. त्यामुळे केवळ दौरे, बैठका आणि घोषणांपेक्षा प्रत्यक्ष मदत शेतकर्यांच्या खात्यावर जमा करण्याची गरज असल्याचे ठाकरे यांनी म्हटले.
मागील वर्षी सरकारने जाहीर केलेली कर्जमाफी प्रत्यक्षात किती शेतकर्यांना मिळाली, याचा हिशेब सरकारने द्यावा, अशी मागणीही त्यांनी केली. कर्जमुक्ती नेमकी कुठल्या शेतकर्यांना मिळाली, त्याची यादी जाहीर करा, असेही ठाकरे म्हणाले. दुष्काळग्रस्त भागाची पाहणी करण्यासाठी दौरे करण्यापेक्षा शेतकर्यांना तातडीने मदत देण्याला प्राधान्य द्यावे, असे ठाकरे यांनी स्पष्ट केले. यापूर्वीही त्यांनी दुष्काळाचे पंचनामे करण्यासाठी मुहूर्त पाहण्यापेक्षा तातडीने दुष्काळ जाहीर करून मदत देण्याची मागणी केली होती.
दरम्यान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज लातूर आणि धाराशिव जिल्ह्याच्या पाहणीनंतर दोन दिवसांत दुष्काळाबाबत शासन निर्णय काढून शेतकर्यांना थेट आर्थिक मदत देण्याचे संकेत दिले आहेत. या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे यांनी आज पत्रकार परिषद घेऊन सरकारसमोर थेट प्रश्न उभे केले.
कशाची वाट बघताय?
उद्धव ठाकरे म्हणाले की, पाऊस जरी पडला तरी या दुष्काळाने जी पिकं करपून गेलेत, त्यांना कोण काय येणार नाही. खरीपाचा हंगाम जो होता तो शेतकर्याच्या हातातून पूर्ण गेला आहे. डोक्यावरचं कर्ज चढलं आहे. मी स्वतः अनेकदा शेतकर्याच्या बांधावरती गेलो आहे. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री सगळेजण बांधावर गेले होते. आणि त्यामध्ये मग फोटो येतात, कोणाला जवळ शेतकरी रडतोय त्याला जवळ घेतलाय, मग आम्ही वार्यावर सोडणार नाही, पण शेतकर्याला रूर धीर द्या. पण मुख्यमंत्री महोदय असं म्हणाले की ५ ऑक्टोबर नंतर पंचनामे सुरू होतील. कशाची वाट बघताय? ५ ऑक्टोबर काय म्हणजे, म्हणून मी थोडेसं त्यांची खिल्ली उडवली होती. कारण शेतकरी इकडे त्याचे प्राण कंठाशी आलेले आहेत. जनावरांचा चार्याचा प्रश्न निर्माण झालेला आहे, मुलांची लग्न जुळत नाहीयेत, सगळंच वाटोळं झालंय, डोक्यावरती कर्ज चढलेलं आहे.
दुष्काळी दौरे नुसते काजू-बदाम खाण्यासाठी आहेत का?
आम्ही दोन-तीन दिवसात याबाबत काहीतरी घोषणा करू म्हणता, मग तुम्ही कॅबिनेट मिटिंग घेताय कशाला? कॅबिनेट मिटिंगमध्ये होतंय काय? हे दुष्काळी दौरे नुसते काजू-बदाम खाण्यासाठी आहेत का? दुष्काळी दौरे तुम्ही जे काय करता आहात, त्याच्यामध्ये खरोखर तुमच्यासोबत जे काही अधिकारी आहेत, तुमचे लोकप्रतिनिधी आहेत, तुमचे सहकारी मंत्री आहेत, त्यांना शेतकर्याच्या दुःखाशी देणं-घेणं आहे की नाही, हे आम्हाला काही कळत नाही, असा टोला त्यांनी लगावला.